तरुणाई

|
हेच ते वय असतं,
जिथे कुणाचं भय नसतं.
मोकळी असते स्वप्नातली वाट,
आणि कल्पनाही असते स्वस्त.

नको असते उंच शिखर,
छोटंसं टेकाड पुरेसं असतं.
मन भरून गप्पा मारायला,
जर कुणी असेल मस्त.

याच त्या वयामध्ये,
विश्रांतीला नसतो वेळ.
उमेदीच्या गावावारती,
प्रयत्नांची असते गस्त.

हेच तर ते वय असतं,
जिथे नेमकं मन फसतं.
नजरेतले कळता भाव,
लाडे लाडे गाली हसतं.

नेमकी याच वयात,
कुणी लिहिली ज्ञानेश्वरी,
किंकाळी फोडण्या दिल्ली दरबारी,
कुणी होते पुरे व्यस्त.

याच त्या कोवळ्या वयी,
देशासाठी स्वीकारली फाशी,
कुणी वाचवण्या आपली झाशी,
भय फेकुनी कंबर कसत.

हेच ते वय असतं,
जिथे मन आपलं नसतं.
इथे नेमकी चुकते वाट,
कुणा नेमकं गाव गवसतं.

इथे ना चुकीला शाप असतो,
ना कधी पश्चाताप असतो.
येईल ते भोगण्याला,
इथे खुलं दार असतं.

याच वयात आयुष्याचा,
नेमका लागतो डाव जुगारी.
हुकमी पण नसतानाही,
उद्यासाठी पानं पिस्त.

बेपर्वाई वागण्यात असते,
पण आदर्शांना नसतो विसर.
उनाडकीच्या पंखाखाली,
निरागसतेचं पाखरू वसत.

हरणे म्हणजे सरणे नाही

|
हरणे म्हणजे सरणे नाही,
बरंच काही असतं बाकी.
एखाद्याच अपयशाने,
व्हायचं नाही एकाकी.

जिंकणारा  असतो एकटाच,
हरणाऱ्या सोबत सोबती.
सूर्य नाही बनता आले,
तरी चंद्र म्हणून उजळावे राती.

जरा घेतला विसावा,
म्हणजे काही दमलो नाही.
आयुष्य अखंड सराव आहे,
म्हणून विजयात रमलो नाही.

हरणेच देते पुन्हा संधी,
बरेच काही सुधारण्यासाठी.
नव्याने लढून लढाई,
विजयाची गुढी उभारण्यासाठी.

तिथेही पुन्हा हरलास तरी,
हिरमुसून जाऊ नकोस.
जिंकणाऱ्याला शुभेच्छा दे,
तिथेही मागे राहू नकोस.

जगताना जगावे असे कि,
मेल्यानंतरही रहावे काही.
आयुष्य हे सुंदर आहे,
त्याचा शेवट हे मरणे नाही.