शिकारी............

|
 The hunter फार पूर्वीची गोष्ट आहे. एका रानात एक शिकारी शिकार करण्याकरता गेला होता. उमदा, देखणा. त्याच्या डोळ्यांत स्वत:च्या शिकारीच्या कौशल्याबद्दल अभिमान होता! त्याला आस होती शौर्याची.. महान कृत्ये करून दाखविण्याची! रात्री शिकारीची जय्यत तयारी करून तो उमदा शिकारी रानात गेला. रात्रीच्या अंधुकशा प्रकाशात त्याला एक काळवीट दिसले. काळसर हिरवी त्वचा. त्यावर मोठमोठे बासुंदी रंगाचे ठिपके. आणि आकर्षक डौलदार िशगे असलेले ते काळवीट कुणालाही हर्षभरित करेल इतके सुंदर होते.

शिकाऱ्याने आपले धनुष्य सरसावले. नेम धरला. आणि आता तो बाण मारण्यासाठी अगदी सज्ज झाला. त्याने आपल्या सावजावर सर्व लक्ष एकाग्र केले. परंतु बराच वेळ गेला तरी शिकाऱ्याला त्या काळवीटावर बाण सोडवेना.

कारण- ते काळवीट फार काहीतरी ऐकण्यात तल्लीन झाले होते. शिकाऱ्याने कानोसा घेतला. दूर अंतरावर, पहाडाच्या टोकाशी ते ऐटबाज काळवीट उभे होते आणि खालच्या खोल दरीत आदिवासी लोक मनमुक्त गाणे गात निसर्गाच्या नीरव शांततेत नृत्य-संगीताचा आस्वाद घेत होते. संथ लयीतील ते संगीत खरोखरच असीम आनंद देणारे होते. ते काळवीटही त्या संगीताच्या नादात तल्लीन होऊन गेले होते. शिकाऱ्याला मोठी गंमत वाटली. ही संगीताची जाण या काळवीटात आली कुठून? त्याची ती तल्लीनता, रसिकता पाहून शिकारी हैराण झाला. धनुष्याला लावलेला बाण त्याने जरा सलावला. इतक्यात ते संगीत थांबले. त्याचक्षणी नेमका शिकारीही भानावर आला. ‘अरे, मी नुसता पाहत काय बसलोय? मी इथे शिकारीला आलोय आणि माझ्या समोर इथे ही मस्त शिकार उभी आहे..’ असा विचार करत तो नेम धरणार इतक्यात ते काळवीट सुळकन् रानात पळून गेले. शिकाऱ्याने ठरवले की, उद्या पुन्हा या ठिकाणी शिकारीसाठी यायचेच.

त्यानंतर आठ-दहा दिवस हाच भुताटकीसारखा प्रकार घडत होता. शिकारी जय्यत तयारीनिशी शिकारीला येत असे. काळवीट त्या ठिकाणी मंत्रमुग्ध होऊन गाणे ऐकत उभे असे. खालच्या दरीतून ढोल आणि गाण्याच्या बोलांचा हवेत तरंगत येणारा आवाज घुमत असे. आणि शिकाऱ्याला त्या काळवीटाच्या डोळ्यातील गाण्याबद्दलची व्याकुळता भुरळ पाडे. परंतु मनावर दगड ठेवून शिकारी मनाचा निग्रह करत असे आणि त्याचा निश्चय पक्का होऊन तो बाण सोडेपर्यंत दरीतले संगीत थांबत असे आणि काळवीट नेहमीप्रमाणे पळून जात असे.

रात्री झोपेतही त्या काळवीटाचे भावविभोर डोळे शिकाऱ्याला दिसत. पण त्याचवेळी त्याच्यातला मत्त शिकारीही जागा होई. तो स्वत:ला दुषणं देई. छट्! एक साधे काळवीट आपल्याला मारता येऊ नये?

अखेरीस एके दिवशी त्याने एका स्थानिक आदिवासी मित्राला सोबत घेतले. तरी त्या नेहमीच्या शिकारीच्या ठिकाणी गेल्यावर रोजच्याच घटनांची पुनरावृत्ती सुरू झाली. शिकारी झुडपात दडून बसला. काळवीट त्या विशिष्ट ठिकाणी येऊन उभे राहिले. शिकाऱ्याने धनुष्य-बाण काढले. नेम धरला. आणि तेवढय़ातच ते पहाडी संगीत सुरू झाले. दरीतून सुमधुर स्वर कानावर पडू लागले. काळवीट मंत्रमुग्ध होऊन ते ऐकू लागले.

काळवीटाचे भावविभोर डोळे पाणावले. शिकाऱ्याने मनाचा निग्रह करून नेम धरला; पण बाण मारण्याचा धीर काही त्याला झाला नाही. त्या काळवीटाची आर्तता, तन्मयता त्याला इतकी मन मोहवून टाकत होती, की तोदेखील भान हरपून गेला होता..

इतक्यात संगीत थांबले. संगीत थांबताक्षणीच काळवीट निमिषार्धात गायब झाले. झाला प्रकार शिकाऱ्याच्या आदिवासी मित्राने साक्षीभावाने अनुभवला होता. काळवीट नजरेआड झाल्यावर आणि भानावर आल्यावर शिकाऱ्याने मित्राला म्हटले की, ‘बघ, हे असं रोज चाललंय!’

ते ऐकून मित्र म्लानपणे हसला. आपल्या शिकारी मित्राच्या पाठीवर थाप मारून म्हणाला, ‘खरं सांगू मित्रा तुला, ऐकशील का? तू या सावजाचा नाद सोड. जोवर दरीत हा ढोल वाजतोय, तोवर तुला त्याची शिकार करणे कधीच शक्य होणार नाही.’

आता तर शिकारी जास्तच बुचकळ्यात पडला. त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून मित्र म्हणाला, ‘काही दिवसांपूर्वी तुझ्यासारख्याच एका शिकाऱ्याने एका काळवीटाच्या मादीची शिकार केली. खाली दरीमध्ये जे सुमधुर संगीत सुरू असते आणि जो ढोल वाजत असतो, तो कशापासून बनला आहे ठाऊक आहे? ती जी मादी काळवीट होती ना, तिच्या चामडय़ापासून हा ढोल बनलाय! आणि ती ज्या काळवीटाची मादी होती, तोच हा काळवीट! जो सदैव आपल्या प्रियेच्या आठवणींत तिच्या अस्तित्वाचा माग काढत दररोज इथे येतो. आणि आपल्या प्रियेच्या कातडय़ापासून बनविलेल्या ढोलाच्या तालावरचं संगीत जीवाचा कान करून ऐकत, काना-मनात साठवून भरल्या डोळ्यांनी निघून जातो..’

मित्राने सांगितलेली काळवीटाची ही कहाणी ऐकल्यावर मात्र शिकाऱ्याचे डोळेही पाण्याने डबडबले त्याने भारावल्या स्थितीत हातातील धनुष्य-बाण खाली टाकून दिले आणि काळवीट ज्या दिशेने निघून गेला होता त्या दिशेकडे तो वेदनाभरल्या चेहऱ्याने पाहत राहिला..