मी जगले तुम्ही पण जगा! - सिंधुताई सपकाळ
"एका रात्रीसाठी घर देता का, अशी विनवणी करूनही कुणी मला घर दिलं नाही. पण आज मी अनेकांना घर दिलं. दुःख कुरवाळत बसले की दुःख आपल्याला खाते. जागणे महत्त्वाचे. मी जगले तुम्ही पण जगा'', अशा शब्दात सिंधुताई सपकाळ यांनी जगण्याचा अर्थच दापोलीकरांना सांगितला.
मैत्री प्रतिष्ठान टेटवली आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या.
यावर्षी प्रथमच टेटवलीच्या मैत्री प्रतिष्ठानने दापोलीत विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेचे काल पहिले पुष्प सिंधुताई सपकाळ यांनी गुंफले. हजारो अनाथ बालकांचा सांभाळ करणारी ही माऊली राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहात येताच दापोलीकरांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना मानवंदना दिली आणि त्यानंतर सिंधुताईंनी आपले जगणेच उलगडून दाखवले. कविता, शेर, कधी मिश्किल टिपणी करीत सिंधुताईंनी त्यांचे जगणे मांडले आणि उपस्थित दापोलीकर भारावून गेले. ताई म्हणाल्या, ""हाफटाईम चौथी पास आहे मी. पण आज अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवर आहे. माझ्यावर सिनेमा निघाला. कर्नाटकात दहावीच्या अभ्यासक्रमात माझ्यावर धडा आहे; मात्र महाराष्ट्रात नाही. कारण महाराष्ट्रात मेल्यावरच माणसे मोठी होतात. जिथे मेल्यानंतर माणसे मोठी होतात, त्याला महाराष्ट्र म्हणतात. असे असले तरी इथली माती महान आहे. त्यागाची आहे. बलिदानाची आहे आणि माझे या मातीवर आणि देशावर प्रेम आहे. अमेरिकेत मी साहित्य संमेलनात बोलायला उभे राहिल्यावर भारत माता की जय, जय महाराष्ट्र अशा घोषणा झाल्या आणि मी भारावून गेले. जगात कुठल्याही देशाला माता म्हणत नाहीत. हा मान फक्त माझ्या देशाला आहे. माता म्हणजेच माझ्या देशाला माऊली म्हटले जाते. म्हणून स्त्री जगली पाहिजे. तिची हत्या करू नका. जरी स्त्री जगली तरच राष्ट्र जगेल. आपल्या संस्कतीचा, परंपरेचा मान ठेवला पाहिजे. वाढदिवसाला फूंक मारून मेणबत्त्या विझविण्याची आमची संस्कृती नाही. स्त्रियांनी अंगभर कपडे घातलेच पाहिजेत.''
मला माझ्या नवऱ्याने घराबाहेर काढले. मुलगी झाल्यावर तिची नाळ मी दगडाने तोडली. स्मशानातील निखाऱ्यांवर स्मशानातल्याच पिठाची भाकरी भाजून खाल्ली. रेल्वेत भिक मागितली. स्मशानातल्या भाकरीने मला जगायला शिकवले आणि मग मी अनाथ मुलांची आई झाले. माझ्या नवऱ्यालाही माफ केले. स्त्रियांनी माफ करायला शिकले पाहिजे. मी जगले. परिस्थितीवर मात करून जगले. म्हणून आज इथवर आले आहे. जगणे सुंदर आहे. त्यामुळे दुःख कवटाळून न बसता जगायला शिका, असे सिंधुताईंनी यावेळी सांगितले.
सोमवार, १७ जानेवारी, २०११
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा